पर्यावरण

पर्यावरण दिन

आपल्या सभोवार जे जे काही दिसते ते ते सर्व म्हणजे पर्यावरण. पर्यावरण म्हणजे निसर्ग. हवा, पाणी, हवेतील विविध वायू, सर्व सजीव व निर्जीव गोष्टी म्हणजे-नद्या, आकाश, डोंगर, वृक्ष, जंगल, सागर, वनस्पती, पाणी, हवा या सर्व गोष्टींचे आपल्या आजूबाजूला जे आवरण आहे तेच पर्यावरण होय. निसर्गातील या सर्वच गोष्टी मानवोपयोगी व मन प्रसन्न करून टाकणाऱ्या आहेत. पण स्वतःच्या सुखासाठी निसर्गावर मात करण्याच्या इच्छेने मानवाने निसर्गाचा समतोल बिघडवला. यामुळे पर्यावरणावर परिणाम होऊ लागला. औद्योगिकीकरण व जंगलतोड यामुळे हवामानात बदल झाला. जमिनीची धूप वाढली. कस कमी झाला. रासायनिक कीटकनाशकांमुळे विषारी द्रव्यांचा परिणाम जीवसृष्टीवर व मानवी जीवनावर होऊ लागला. कारखान्यातील दूषित पाणी, कचरा नद्यांत सोडल्यामुळे  पाणवनस्पती, मासे नष्ट होऊन जलप्रदूषण वाढले. कारखान्यांच्या, वाहनांच्या धुरामुळे हवेचे प्रदूषण वाढले. रस्ते, घरे बांधण्यासाठी डोंगर व झाडांचा नायनाट होऊ लागला. गाड्यांचे आवाज, हॉर्न, यंत्राचे आवाज, नगारे, लाऊडस्पीकर, रेडिओ, टी.व्ही. यांच्या कर्कश आवाजाने ध्वनिप्रदूषण होऊन शारीरिक आजार होऊ लागले. वाढती लोकसंख्या, शहरीकरण, उद्योगधंदे यांच्यामुळे प्रचंड कचरानिर्मिती होऊन दुर्गंधी व रोगराई निर्माण होऊ लागली. म्हणजेच माणसाने स्वतःच स्वतःला धोकादायक परिस्थिती निर्माण करून विनाशाकडे वाटचाल चालविली आहे. दूषित हवा, दूषित अन्नपदार्थ यामुळे माणसे व्याधीग्रस्त होत चालली आहेत. दूषित वायूमुळे पृथ्वीभोवती असणाऱ्या ओझोनच्या संरक्षणात्मक कवचाला धोका निर्माण होऊन त्यातून येणाऱ्या अतिनील किरणांमुळे त्वचा व डोळ्यांचे विकार होऊ लागले आहेत. अमाप जंगल, वृक्षतोडीमुळे शुद्ध हवा, पाऊसपाणी, अन्नधान्ये यांची टंचाई निर्माण झाली आहे. हा सर्व -हास थांबविण्यासाठी, पर्यावरण रक्षणासाठी व ते स्वच्छ, समतोल राखण्याच्या दृष्टीने प्रत्येकाने प्रयत्न  करायला हवा. पर्यावरणाच्या गभीर समस्येकडे लक्ष वेधण्याकरिता दरवर्षी ५ जून हा पर्यावरण दिन म्हणून पाळला जातो. त्यासाठी वृक्ष लावून वाढवावेत. प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर टाळावा. 'कचरा' कचराकुंडीतच टाकावा. स्वयंपाकासाठी गॅस, बायोगॅसचा वापर करावा. पाणी वाया घालवू नये. रॉकेल, पेट्रोल, डिझेल यांसारख्या संपुष्टात येणाऱ्या खनिज तेलाचा काटकसरीने वापर करावा. गिरण्यांची धुराडी उंच ठेवावी. रासायनिक खते, कीटकनाशकांचा काळजीपूर्वक वापर व्हावा. होळीसाठी वृक्षतोड न करता कचऱ्याची व दुर्गुणांची होळी करावी. दिवाळीला निर्धूर व आवाजरहित फटाके वापरावेत. जत्रेवेळी, नागपंचमीला प्राणीहत्या व सर्पहत्या करू नये. वन्यप्राण्यांचे संरक्षण करावे.
पुण्याचे सुप्रसिद्ध समाजसेवक मोहन धारिया यांनी 'वनराई' संस्था स्थापन करून पर्यावरण संरक्षण - महत्त्व पटवून दिले. राळेगणसिद्धीच्या अण्णा हजारे यांनीसुद्धा पर्यावरण समतोल राखण्याच्या दृष्टीने उपक्रम राबविले आहेत. आपणही शिबिरे, सहली, वृक्षदिंडी, घोषवाक्ये, स्लाईड शो, पथनाट्ये, व्याख्याने याव्दारे जागृती केली पाहिजे.

Disqus Shortname

Comments system