डोळस दागिने
चष्म्याच्या दांडीत
एक चिमुकला संगणक, भिंगाच्या कोपऱ्यात कणभर कॅमेरा असलेले ए.आर. चष्मे हे डोळ्यांच्या
दुनियेतलं अद्भूत वास्तव आहे. सध्या काय चाललं आहे त्यासंदर्भातलं संशोधन? त्यामुळे
दृष्टिच्या क्षेत्रात नेमका काय फरक पडणार आहे?
''ओके, ग्लास, आता पाठव
व्हिडीयो!''
पोटाचं ऑपरेशन करता-करता
चेन्नईच्या लाइफ-लाइन हॉस्पिटलच्या डॉ. राजकुमारांनी आपल्या चष्म्याला तोंडी सांगितलं.
चष्म्याने आज्ञा पाळली. दोन गल्ल्यांपलीकडल्या सभागृहात तीस डॉक्टर आणि अनेक वैद्यकीय
विद्यार्थी बसलेले होते. त्यांना ते ऑपरेशन थेट डॉ. राजकुमारांच्या 'चष्म्यातून' दिसलं!
'गूगल-ग्लास' नावाचा
अद्भुत चष्मा वापरून ऑपरेशन करणारे डॉ. राजकुमार हे जगातले दुसरे आणि भारतातले पहिलेच
शल्यविशारद!
तसल्या चष्म्याच्या
एका दांडीत चक्क एक चिमुकला संगणक बसवलेला असतो. शिवाय उजव्या िभगावरच्या बाहेरच्या
कोपऱ्यात चक्क एक नखभर, दमदार कॅमेरा असतो. तो आज्ञाधारक कॅमेरा जे जे टिपतो ते ते
चष्मेवाल्याच्या दृष्टीच्या महामार्गावरच्या एखाद्या पाटीसारखं दिसत रहातं पण दृष्टिपथात
अडथळा आणत नाही.
शिवाय ऑपरेशन चालू असतानाच,
तोंडीच दिलेल्या हुकुमांवरून, तो संगणक त्या उघडय़ा पोटातलं चित्रण व्हिडीयोवर पाठवतो
आणि जगातल्या इतर तज्ज्ञांचा तातडीने सल्ला घेऊ शकतो. चष्म्याच्या उजव्या दांडीच्या
कानाकडच्या बाजूला एक स्पीकर असतो. तो सारी माहिती त्या कानाकडच्या हाडाला सांगतो.
आवाजाची ती स्पंदनं हवेतून, बाकानातून न जाता त्या हाडातून तडक कानाच्या आतल्या भागात
आणि तिथून मज्जातंतूंपर्यंत पोचतात आणि स्पष्ट ऐकू येतात. त्याच दांडीच्या विवक्षित
भागात बोट फिरवूनही संगणकाला आदेश देता येतात.
दोन वर्षांपूर्वी असे
ए. आर. चष्मे फार जड होते. आता ते नेहमीच्या गॉगलपेक्षाही हलके झाले आहेत.
ऑपरेशनच्याच वेळी नव्हे
तर इतर दैनंदिन व्यवहारांतही 'गूगल-ग्लास' बडे कामकी चीज आहे. तो रस्त्याचे नकाशे दाखवतो;
बातम्या आणि हवामानवृत्त सांगतो; ई-मेल वाचतो आणि आंतरजालावरची माहितीही हुडकतो. ही
सारी कामं तर स्मार्टफोनही करतो. पण स्मार्टफोनमधून हे सारं शोधताना डोळे आणि हात अडून
रहातात. परक्या देशात रस्त्यावरून चालताना दिसणाऱ्या अगम्य लिपीतल्या पाटय़ा, तिथल्या
हॉटेलातली मेन्यूकरड, दुकानांतल्या मालाच्या किमती हे सारं गूगल-ग्लासचा कॅमेरी डोळा
'वाचतो' आणि त्यांचं सराईत लिप्यंतर-भाषांतर करून देतो. समोरच्या माणसाचा चेहरा आंतरजालावर
शोधून त्याचं न आठवणारं नावही नेमकं सांगतो. त्यासाठी भटकंती, जेवण, संभाषण, खरेदी
या कशातही खंड पाडावा लागत नाही. मधूनमधून
चष्म्याच्या माहितीपटाकडे एक चोरटा तिरपा कटाक्ष टाकला की झालं!
तो माहितीपट चष्म्यातल्या,
डोळ्याला जवळजवळ भिडलेल्या संगणकावर दिसला तर तो वाचता येणं शक्य नाही. म्हणून संगणकाच्या
प्रोजेक्टरमधून निघालेले किरण एका लोलकातून असे वळवले जातात की ते समांतर होऊन डोळ्याच्या
िभगावर पडतात. त्यामुळे ते थेट मज्जापटलावर केंद्रित होतात. किरण असे आले की त्यांच्यामुळे
डोळ्यासमोर उभं रहाणारं २५ इंची चित्र क्षितिजाच्या पाश्र्वभूमीवर, आठ फूट अंतरावर
दिसतं(आकृती). अशा प्रदर्शनाला ऑगमेन्टेड रियालिटी, (अफ -सुधारलेली वस्तुस्थिती) म्हणतात.
असल्या चष्म्यांनी खाजगी
संभाषणंही रेकॉर्ड केली गेली किंवा खाजगी नोंदी असलेला चष्मा चोरीला गेला तर ती व्यक्तिगत
माहिती चुकीच्या माणसांना मिळेल आणि वैयक्तिक गोपनीयतेवर अतिक्रमण होईल अशी लोकांना
भीती वाटते. त्यावर कायदेशीर आणि तांत्रिक इलाजांचा शोध चालू आहे. ए. आर चष्मा लावून
गाडी चालवताना चित्त विचलित होऊ शकतं म्हणून तसं करण्यावर इंग्लंडमध्ये कायदेशीर बंदी
आहे.
भविष्यात याला एक अपवाद
असू शकतो.
कुठल्याही गोष्टीचा
त्रिमिती अंदाज यायला, वस्तूचं आपल्यापासूनचं नेमकं अंतर समजायला वातावरणाची खोली जोखणारी,
दोन्ही डोळ्यांची एकत्रित (स्टीरियोस्कोपिक) दृष्टी अत्यावश्यक असते. एका डोळ्याला
गंभीर आजार झाला तर माणसं तशी सखोल दृष्टी गमावून बसतात. अशा माणसांना रस्त्यातून गाडी
हाकताना इतर गाडय़ांच्या अंतरांचा आणि वेगाचा अचूक अंदाज येत नाही. माजी भारतीय कर्णधार
पतौडी एकाक्ष नजरेने चेंडू हेरून उत्तम फलंदाजी करत असे. ते त्यांचं कसब याच कारणासाठी
असामान्य मानलं जातं. अशा ठिकाणी ए. आर. चष्मा मदतीला येऊ शकतो. त्याच्यातला संगणक
समोरच्या रस्त्याचं त्रिमिती चित्र बनवू शकतो. तसं चित्र ए. आर. च्या प्रोजेक्टरमधून
चांगल्या डोळ्याच्या मज्जापटलावर थेट प्रक्षेपित केलं की त्या एकाक्ष चालकांना गाडी
अधिक बिनधोक चालवता येईल. चष्म्यातून रस्ताच बघायचा असल्यामुळे चित्त विचलित होण्याचा
प्रश्नच येणार नाही.
ए. आर. चष्म्याचा शोधच
सध्या अद्भुत वाटतो आहे. पण अद्भुताच्या पार पोचणं हा विज्ञानाचा तत्त्वसिद्ध हक्क
आहे.
बाबाक परविझ ना
बाबाक परविझ ना