स्वामी विवेकानंद

भारताच्या पुनरुत्थानाच्या काळात आणि
हिंदुधर्माच्या पुनरुज्जीवनाच्या काळात स्वामी विवेकानंदाचे स्थान अनन्यसाधारण
आहे. भारतीय सामान्य जनतेला दैन्यावस्थेतून आणि अज्ञानातून सोडवण्यासाठी त्यांनी
शिक्षण प्रसाराचे कार्य केले.
स्वामीजींचा जन्म कलकत्ता येथे १२
जानेवारी १८६३ रोजी झाला. त्यांच्या मातेचे नाव होते भुवनेश्वरी व पित्याचे नाव
विश्वनाथबाबू दत्त. त्यांचे पाळण्यातील नाव विरेश्वर असे होते. बिले, नरेंद्र अशा नावानेही त्यांना हाक मारली जाई.
बालपणी त्यांची वृत्ती खोडकर होती. बालवयातच त्यांचे चित्त एकाग्र होत असे.
बालपणापासून कोणतीही गोष्ट ते पारखून घेत. बालपणापासून कोणतीही गोष्ट ते पारखून
घेत. झाडावर ब्रह्यराक्षस वगैरे कोणी राहत नाही. हे सगळे खोटे आहे त्यांनी लहानपणी
झाडावर चढून सिध्द करून दाखविले. भगवान श्रीकृष्ण आणि हनुमंत हे त्यांचे आदर्श
होते. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण कलकत्ता येथे झाले. शाळेत असतानाच त्यांचे
वडील अभ्यासाबरोबर साहित्य, तत्त्वज्ञान इ. चा अभ्यास
त्यांच्याकडून करून घेत. ईश्र्वरचंद्र विद्यासागरांनी त्यांचे वक्तृत्वाबद्दल खूप
कौतुक केले होते. जनरल असेंब्ली या कॉलेजातून तत्त्वज्ञान हा विषय घेऊन ते बी.ए.
झाले. प्राचार्य हेस्ट्री हे इंग्रजी शिकवीत असताना Ecstasy ह्या
शब्दाचा उच्चार त्यांच्याकडून झाला. त्याचा अर्थ समाधी. त्यांची खरोखरच समाधी
लागली. नरेंद्राने तेव्हापासून समाधी, ईश्वराचा शोध इ. विषयी
चिंतन सुरू केले आणि ते रामकृष्ण परमहंसांकडे आले.
रामकृष्ण परमहंसांकडे आल्यावर
त्यांच्या जीवनाला एक वेगळीच कलाटणी मिळाली. आपण ईश्वर पहिला आहे काय? असा प्रश्न रामकृष्णांना विचारताच त्यांनी 'हो' उत्तर दिले. मलाही ईश्वर पाहायचा आहे, ही तळमळ नरेंद्राला लागली. नरेंद्र चिंतन, मनन,
ध्यान-धारणा करू लागला. योग्य वेळ येताच रामकृष्णांनी त्यांना आपले
आध्यात्मिक धन संक्रमित केले. "मानव सेवा हीच ईश्वरसेवा" हे
रामकृष्णांचे शब्द त्यांच्या कानात घुमू लागले आणि मनुष्यसेवा करण्यासाठी संपूर्ण
भारतभर भ्रमण करण्याचे त्यांनी ठरवले. नदी, नाले, वाळवंट, पर्वत तुडवीत ते फिरत राहिले. लोकांचे दुःख,
दैन्य, अज्ञान, रोगराई,
उपासमार, इ. निरीक्षण केले. देशाची सर्व
दृष्टीने सुधारणा करण्याच्या व प्रगतीच्या दृष्टीने नि:स्वार्थ भावनेने वाहून
घेणारे नवे संन्यासी तयार व्हावयास हवे असे त्यांना वाटले. त्यांच्यामधील
पुरुषार्थ जागरूक झाला. भारतभ्रमणात ते कन्याकुमारीला पोहोचले. २५ ते २७ डिसेंबर
१८९२ असे तीन दिवस त्यांनी खडकावर राहून चिंतन केले आणि लोकांना दैन्यावास्थेतून
बाहेर काढले पाहिजे असे जीवितकार्य त्यांनी ठरविले.
"उठा, जागे
व्हा चांगले कार्य करा, थांबू नका". हा अमृत बोध
त्यांना झाला. अमेरिकेत सर्वधर्मपरिषद भरवली जात आहे, असे
त्यांना समजले. त्यासाठी तिथे जाण्याचे त्यांनी ठरविले. ११ सप्टेंबर १८९३ ला ते
शिकागोला पोहोचले. विवेकानंदांची भाषणाची वेळ आल्यावर आपल्या तुरुंचे स्मरण करून
त्यांनी "अमेरिकेतील माझ्या बंधुभगिनींनो" हे शब्द उच्चारले. टाळ्यांचा
कडकडात झाला. अवघ्या पाच मिनिटांच्या भाषणात त्यांनी सर्व सभा जिंकली. स्वामीजींचे
वक्तृत्व प्रभावी होते. त्यांच्या शब्दांनी ते सर्वांची हृदये जिंकून घेत.
पुढे इंग्लंडला गेल्यावर मागरिट नोबल
त्यांच्या शिष्या झाल्या. तिचे नाव त्यांनी 'भगिनी
निवेदिता' असे ठेवले. परदेशातून परतल्यावर त्यांनी १८९८
मध्ये 'रामकृष्ण मठ' उभा केला. नंतर
रामकृष्ण मिशनची स्थापना केली. मठाचे ध्येयधोरण हे आध्यात्मिक व मानवसेवा
स्वरूपाचे होते. त्यांच्या मते, पश्चिमेने बाह्य जग तर
पूर्वेने आंतरिक जग जिंकण्याचे प्रयत्न केले होते. पण दोघांनी हातात हात घालून
एकमेकांचे भले करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. भविष्यकाळाला नवे वळण दिले पाहिजे.
म्हणजे पूर्व-पश्चिम हा भेद राहणार नाही. विज्ञानाच्या सहाय्याने सर्व गोष्टी
तपासून पाहिल्या पाहिजेत. धर्म हा भारताचा केंद्रबिंदू आहे, गाभा
आहे पण धर्मामुळे मानवाच्या चित्ताचे शुध्दीकर्म झाले पाहिजे व धर्माने संकुचित
दृष्टिकोनातून बाहेर काढून उदार व व्यापक दृष्टिकोन बनविण्यास मानवाला मदत केली
पाहिजे असे ते म्हणत.
स्वामीजी संपूर्ण मानवजातीच्या
आध्यात्मिक उद्धाराचे कार्य करणारे मार्गदर्शक स्तंभ होते. वेदान्त हा प्रत्यक्ष
मानवाच्या ऐहिक जीवनात कसा सुखकारक, समृध्द
व उन्नत असू शकतो, हे त्यांनी आपल्या विचारांनी व कार्याने
दाखवून दिले. त्यांच्या वेदान्ताला 'व्यावहारिक वेदान्त'
म्हणतात. "जेव्हा तुम्ही सर्वांकडे आत्मौपम्य दृष्टीने पाहाल,
तेव्हा ही स्त्री, हा पुरुष असा भेद तुमच्यात
राहणार नाही" असे स्वामीजी म्हणत.
शेवटी असे कार्य करीत असताना आपला
अंतकाळ जवळ आल्याचे त्यांना जाणवले आणि ४ जुलै १९०२ रोजी ते पंचतत्वात विलीन झाले.
आपल्या तेजस्वी विचारांनी आणि कार्याने अमर झाले. "मानवसेवा हीच
ईश्वरसेवा"