Saturday, 19 November 2016

शिक्षण



शिक्षक हा एक पिढी घडवत असतो, असे म्हणतात. पण, लहान मुलांची पहिली शाळा असते घर! शिक्षकाच्या ताब्यात ही मुले जातात, तेव्हा अभ्यासाबरोबर त्यांचे व्यक्तिमत्त्व कसे घडेल, यावर भर देणे आवश्यक आहे. शिक्षण हे केवळ वैयक्तिक पातळीवरचे नसून ते सामाजिक होईल, तेव्हाच शिक्षणाला खरा अर्थ प्राप्त होईल. 
---------------
आपण आपल्या मुलांना शाळेत कशासाठी पाठवतो? अर्थातच शिकण्यासाठी. पण म्हणूनच ज्यांची मुले शाळेत जात आहेत, ज्यांची शाळेत जायला सुरुवात करणार आहेत, अशा सर्वांनीच माणसाच्या आयुष्यातील शाळा किंवा शिक्षणाचा खरा अर्थ समजून घ्यायला हवा. 
मे महिन्याची सुटी कशी संपली ते कळलंसुद्धा नाही. पण, जून महिना सुरू झाल्यावर मात्र वेध लागतात ते शाळा सुरू होण्याचे. नवीन गणवेश, बूट, दप्तर, पुस्तक, वह्या, सगळेच कसे उत्साहात असतात. मुलांचा आनंद तर गगनात मावत नसतो. एका बाजूला या नव्या वस्तूंचे आकर्षण, तर दुसर्‍या बाजूला पुन्हा वर्षभरासाठी अडकले जाण्याचा नकोसेपणा. अर्थात, नवीन शाळेत जायला सुरुवात करणार्‍यांना या अडकण्याची कल्पना नसते, हा भाग वेगळा.
शाळेत पालकांसाठी एका बालमानसोपचार तज्ज्ञांची कार्यशाळा आयोजित केली होती. त्यात त्यांनी शाळेचा एक उत्तम उपयोग सांगितला. ते म्हणाले, ‘‘मूल शाळेत शिकायचे कसे? हे शिकण्यासाठी जाते. अभ्यासासाठी नाही.’’ याचाच अर्थ शालेय जीवनातील सर्व काळ हा व्यक्तीला आयुष्यात पुढे प्रत्येक प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी किती महत्त्वाचा ठरू शकतो. विनोबा भावेंनी  शिक्षणाची किती सोपी व्याख्या केली आहे, ते पाहा ‘वर्तनातील सकारात्मक बदल म्हणजे शिक्षण’  मला वाटतं इतक्या सोप्या शब्दांत केलेली व्याख्या आणि आज शालेय जीवनाचं जे चित्र आपल्याला दिसतं या दोन्हींत किती तफावत आहे. शिक्षण म्हणजे काय, शाळेत रोज उपस्थित राहणे, अभ्यास करणे, उत्तम गुणांनीच उत्तीर्ण होणे, सर्व वह्या पूर्ण करणे, उत्तम कॉलेजमध्ये प्रवेश मिळणे केवळ या पलीकडे जाऊन शिक्षणाचा अर्थ आपण कधी समजावून घेणार.
एका नऊ वर्षांच्या मुलाचे वडील मला भेटायला आले होते. मुलगा चुणचुणीत, हुशार होता. परंतु, प्रचंड दंगा, मारामार्‍या, अपूर्ण वर्गपाठ यामुळे सतत त्याच्याबद्दल तक्रारी असायच्या. वडील डॉक्टर आहेत. त्यांना जेव्हा मी या गोष्टींची कल्पना दिली तेव्हा ते म्हणाले, ‘‘माझी एक विनंती आहे. तुम्ही माझ्या मुलाला सांगा, की तू प्रत्येक परीक्षेत ९५ टक्के गुण  मिळव. तुझ्या सर्व चुका माफ केल्या जातील. कारण ज्यांना असे गुण मिळतात ते चुकीचे वागले, तरीही त्यांना कुणी बोलत नाही.’’ एक डॉक्टर व्यक्ती मला हे सांगत होती. मी म्हणाले, ‘‘अहो, असं कसं सांगताय तुम्ही मला. कुणाचंही वागणं आणि त्याला परीक्षेत मिळालेले गुण याचा काय संबंध? गुण कितीही मिळाले, तरी वागणं हे चांगलंच असायला हवं.’’ पण, त्या वडिलांचा आग्रह चालूच होता. शेवटी मला त्यांना निक्षून सांगायला लागलं की असा सल्ला मी तुमच्या काय पण कुणाच्याच मुलाला किंवा मुलीला देणार नाही. एक शिक्षक किंवा समुपदेशक म्हणून ते माझ्या तत्त्वात बसत नाही.
वरवर दिसायला हा प्रसंग खूप साधा असेल कदाचित. पण, जेव्हा जेव्हा मला तो आठवतो तेव्हा तेव्हा मी मुळापासून अस्वस्थ होते. कारण आजच्या पालकांची मानसिकता यातून समजून येते. गुणांना महत्त्व नक्कीच आहे. याबाबत माझं दुमत नाही. परंतु, तू कसाही वागलास, तरी चालेल परीक्षेत मात्र ९५ टक्क्यांहून अधिक गुण मिळव. हा विचारच समाजस्वास्थ्यावर घाला घालणारा आहे, असे माझे स्पष्ट मत आहे. आपण परीक्षेतल्या यशामागे इतके आंधळेपणाने धावणार आहोत का? परीक्षेतील यश हे माणसाच्या आयुष्याचा मापदंड ठरू शकतो का? याचेच आणखीन एक उदाहरण. एका मैत्रिणीचा मुलगा दहावीत आहे. काळजीने तिचा जीव खालीवर होत होता. मी म्हणलं, अगं इतका ताण कशाला घेतेस? ती म्हणाली, काय करणार फग्यरुसन कॉलेजलाच प्रवेश हवा आहे. मग कमीत कमी ९७ ते ९८ टक्के गुण पाहिजेत. अगं इतर कॉलेज आहेत, की आणि मुळात हुशार असलेल्या मुलावर प्रवेशाचा ताण कशाला टाकतेस, माझी प्रतिक्रिया. परंतु आपला मुलगा इंजिनिअर होऊन अमेरिकेला गेलाच पाहिजे, या विचाराने झपाटलेल्या त्या आईला माझे म्हणणे पटणे शक्यच नव्हते.
शिक्षणाने माणसाचे व्यक्तिमत्त्व घडत असते. अभ्यास, परीक्षेतले गुण हा आपल्या आयुष्याचा एक लहानसा भाग आहे. पण, आज आपण पूर्ण आयुष्यच त्याने व्यापून टाकले आहे. एका पहिलीतल्या मुलाची आई चिंताग्रस्त चेहेर्‍याने मला भेटायला आली. काय करू टिचर याचे कमी झालेले गुण मला सहन होत नाहीत. माझी तब्येत बिघडली आहे. पेपर मिळाल्यापासून माझं ब्लडप्रेशर वाढलं आहे. मी म्हणाले, ‘‘अहो इतका ताण घेऊ नका. पहिलीतच आहे तो! बघू यात आपण काय करता येईल ते.’’ असं म्हणून मी तिच्या हातातून उत्तरपत्रिका पाहायला घेतल्या. प्रत्येक विषयात वीसपैकी अठरा, एकोणीस. आता मात्र मला कळेना ब्लडप्रेशर वाढण्याइतके वाईट पेपर लिहिले नव्हते त्या मुलाने. माझ्याकडे पाहून आई म्हणाली, ‘‘अहो, एकाही विषयात पैकीच्या पैकी गुण कसे नाही मिळाले. माझ्या मुलात काहीतरी प्रॉब्लेम निर्माण झाला आहे का?’’ मी हतबुद्ध होऊन त्या आईकडे पाहत होते. मुलगा दहावीत येईपर्यंत या आईचे काय होईल, हा प्रश्न मला भेडसावत होता.
शाळा हे मुलांना समाजाभिमुख बनविण्याचे एक माध्यम आहे. तो कारखाना नव्हे. बर्‍याच पालकांची शाळेकडून खूप मोठी अपेक्षा असते. वागायचे कसे, हे शाळेने शिकवायचे. शिस्त शाळेने लावायची. पौष्टिक आहार खायची सवय शाळेने लावायची. मूल्य, तत्त्व, लाईफ स्किल्स शाळेने शिकवायची. अभ्यास तर शाळेनेच घेतला पाहिजे. चांगले संस्कार शाळेनेच करायचे. हे आणि अशा अनेक अपेक्षा शाळेने, ओघानेच शिक्षकांनी पूर्ण करायच्या. पण, मग मला असा प्रश्न पडतो हे सगळं शाळेतल्या शिक्षकांनी करायचे. तेही एका वर्गात साठ मुले असताना. त्यातच शिक्षकांनी आवाज चढवायचा नाही, मारायचे तर नाहीच. रागवायचे नाही. या बंधनात राहून जर शाळेने हे सगळे करायचे, तर पालक घरी करणार तरी काय? पालकत्वाच्या सर्व जबाबदार्‍या जर शाळेनेच निभावयाच्या असतील, तर पालकत्व फक्त फी भरण्यापुरतेच र्मयादित राहणार का? शाळेच्या बर्‍याच कार्यक्रमात पालकांबरोबर बोलण्याची संधी मिळत गेली. पण, शाळेनी कितीही प्रयत्न केले, तरी पालकांच्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत. मुलांना वाढवण्याची प्रथम जबाबदारी पालकांची असते. काही दिवसांपूर्वी एका बाईंनी मला विचारले, तुझ्या मुलांची शाळा कशी आहे? मी म्हणाले, चांगली आहे. तुझी मुलं आहेत. म्हणजे ती शाळा नक्कीच चांगली असणार, त्यांची फाजील आत्मविश्‍वासात्मक प्रतिक्रिया. मी म्हणलं, मुलं कोणत्या शाळेत आहेत यापेक्षा माझा माझ्या पालकत्वावर जास्त विश्‍वास आहे.
शाळेत प्रकल्प दिला गेला, की पालक एखाद्या युद्धाची तयारी करायला लागल्यासारखे त्याच्या मागे लागतात. प्रकल्प मुलांनी करायचा असतो. त्याची प्रक्रिया म्हणजे वेगवेगळय़ा साधनांतून विषयाची माहिती घेणे, चित्र, तक्ता तयार करणे, एखादी प्रतिकृती बनवणे, या सर्व प्रक्रियेतून मुलांना शिक्षण मिळते. अनुभवसमृद्ध असे हे शिक्षण होते. परंतु, सुंदर, सुबक प्रकल्प देण्याच्या नादात या प्रक्रियेकडे कुणाचे लक्षच नसते. प्रकल्प अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याच्या मूळ हेतूलाच धक्का पोहोचत असतो. माझ्या पाल्याचा प्रकल्प जरा कमी सुबक, ओबडधोबड असला तरी चालेल, त्याला मार्क कमी मिळाले तरी चालतील, पण ते मूल त्या प्रक्रियेतून जाणं आवश्यक असतं. हे पालक विसरतात. मुलाला अडचण येईल तिथे मदत करणं वेगळं आणि संपूर्ण प्रकल्प तयार करून त्याच्या हातात देणं यात फरक आहे. 
पालकांना सांगावंसं वाटतं, की आईच्या पोटातून बाहेर आल्यापासून घर ही मुलाची पहिली शाळा असते. उत्तम शिक्षण देणं ही प्रत्येक पालकाची जबाबदारी असतेच. परंतु, उत्तम शिक्षण याचा अर्थ चकचकीत शाळा, महागडी दप्तर-वह्या असा नसून, उत्तम व्यक्तिमत्त्व घडवणे असा असायला हवा. आयुष्यातल्या अपयशाने खचून न जाता आणि यशाने हरळून न जाणारे व्यक्तिमत्त्व बनवणे हे आपले ध्येय असावे. शिक्षक हा एक पिढी घडवत असतो, असे म्हणतात; पण ती पिढी शिक्षकाच्या ताब्यात जाते ती तुमच्या आमच्या घरातूनच. त्यामुळे अभ्यासाबरोबरच त्यांचे व्यक्तिमत्त्व कसे घडेल, यावर भर द्यावा. शिक्षण हे केवळ वैयक्तिक पातळीवरचे नसून, ते सामाजिक असते. मनुष्याचा मनुष्य म्हणून विकास करणे हे शिक्षणाचे प्रथम उद्दिष्ट्य असले पाहिजे. यासाठी शाळा, पालक, शिक्षक यांनी समान पातळीवर येऊन प्रयत्न करायला हवेत. शिक्षणासाठी प्रेमाचे, सुरक्षिततेचे, भावनांची कदर करणारे अशा तर्‍हेचे वातावरण बालकाला मिळाले पाहिजे. या वातावरणाची सुरुवात फक्त चांगल्या घरातच होऊ शकते आणि शाळा हे बालकाचे विस्तारित घर असायला हवे.

Friday, 26 February 2016

Bharat Mata Teri Gatha,
Sabse Unchi Teri Shaan,
Tere Age Sheesh Jhukaye,
De Tujhko Hum Sab Samman!

_______________________________________________________________

Tuesday, 24 November 2015

स्वामी विवेकानंद


          हल्ली व्यक्तिमत्व विकास हा खूप चर्चेचा आणि अनिवार्य असा विषय झाला आहे. अनेक ठिकाणी  त्याचे निरनिराळे अभ्यासक्रमही  उपलब्ध आहेत पण खरे व्यक्तिमत्व म्हणजे काय आणि त्याचा विकास करायचा म्हणजे नेमके काय करायचे यामध्ये फार जुजबी ज्ञान दिले जाते माणसाचे बाहय वेश त्याचे त्याचे बोलणे-वागणे, त्याचे प्रेझेंटेशन यापुरते हे अभ्यासक्रम मर्यादित असतात. त्यामुळे माणसाच्या व्यक्तिमत्त्वात खर्‍या अर्थाने बदल न होता, कुठे कसे वागावे, इथपतच हे अभ्यासक्रम मर्यादित राहतात.या सर्व गोष्टींचा चार करून आम्ही उद्योजक ऑनलाइन मासिकाच्या वाचकांसाठी खर्‍या अर्थाने व्यक्तिमत्त्व विकास म्हणजे काय हे मांडणार आहोत. स्वामी विवेकानंदांनी आपल्या भाषणांमध्ये, साहित्यामध्ये व्यक्तिमत्त्व विकास या विषयाचा उलगडा केला आहे.
 

Disqus Shortname

Comments system